Explore

Search

December 25, 2025 9:38 pm

स्थानिक स्वराज्य संस्थांचा फैसला आज; शहरांचा कारभार कोणाच्या हाती?

मुंबई : राज्यातील 288 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज, रविवार 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल वर्षभराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याने, या रणधुमाळीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.


विधानसभा निवडणुकीत मिळालेलं घवघवीत यश महायुती कायम राखणार का? की महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पुनरागमन करणार? तसेच महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणता पक्ष सर्वाधिक ताकद दाखवणार? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या निकालांतून स्पष्ट होणार आहेत.


यंदाच्या निवडणुकीत नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षांची थेट निवडणूक होत असल्याने, शहरांचा कारभार नेमका कोणाच्या हाती जाणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे स्थानिक राजकारणात थेट जनादेशाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.


दरम्यान, निकालांच्या आदल्या दिवशी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील पाचही विभागांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं चित्र या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मात्र, एक्झिट पोलमधील ही आकडेवारी प्रत्यक्ष निकालांमध्ये कितपत खरी ठरणार, हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आगामी राजकीय वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याने, आज जाहीर होणारे निकाल राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर