मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नव्या आत्मविश्वासाची लाट पसरली आहे. कोणताही राजकीय पाठिंबा नसताना स्वबळावर लढत शिंदे गटाने तब्बल 57 जागांवर विजय मिळवला. या यशामुळे उत्साही झालेल्या शिंदे गटाने आता थेट भाजपवर दबाव वाढवण्याची रणनीती स्वीकारल्याचं दिसत आहे.
राज्यात लवकरच 29 महापालिकांच्या निवडणुका होणार असून या निवडणुकांमध्ये सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी स्पष्ट भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. अपेक्षित जागावाटप न झाल्यास महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं संकेत शिंदे गटाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत भाजपची राजकीय चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विशेष म्हणजे ज्या महापालिकांमध्ये भाजप वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहे, त्याच ठिकाणी शिंदे गट अडथळा निर्माण करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, नगरपरिषद निकालांनंतर महापालिकांतील युतीबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी दिली. युती करायची असेल तर ती खुल्या दिलाने व्हावी, मोठा भाऊ फक्त संख्येवर नाही तर वागणुकीवर ठरतो, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
पुण्यात युतीचा पेच, उदय सामंत मैदानात
भाजप-शिवसेना महायुतीबाबत पुण्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. शिवसेनेकडून 35 जागांची मागणी करण्यात आली असून भाजप त्या मागणीला तयार नसल्याने चर्चा रखडली आहे. हा वाद मिटवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत पुण्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपकडून “मूळ शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेवक निवडून आले?” असा सवाल उपस्थित केला जात असून समाधानकारक जागा न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
नांदेडमध्ये फिफ्टी-फिफ्टीची मागणी
नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपने शिवसेनेला केवळ सहा जागांचा प्रस्ताव दिला असून त्याला शिवसेनेकडून तीव्र विरोध आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत आमदार हेमंत पाटील भाजपसमोर 50-50 जागांची मागणी मांडणार आहेत. ही मागणी मान्य न झाल्यास स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड आणि हदगाव येथे शिवसेनेचे नगराध्यक्ष असून, जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व असल्याचंही त्यांनी नमूद केलं. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नसल्याची कबुली देतानाच, आगामी महापालिका निवडणुकांत शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

