पुणे | प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा हिंदुत्ववादी विचार अधिक बळकट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी अनेक समर्पित कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. भाजप ही कार्यकर्त्यांचा सन्मान जपणारी आणि त्यांना आपलेसे मानणारी संघटना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“भाजपमध्ये आल्यानंतर कोणालाही सावत्र भावासारखी वागणूक मिळणार नाही. येथे प्रत्येक कार्यकर्ता हा सख्ख्या भावासारखा मानला जातो. पक्षात सर्वांना समान सन्मान, संधी आणि जबाबदारी दिली जाते,” असे ठाम मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, देशाला आणि राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी मजबूत संघटन, प्रामाणिक कार्यकर्ते आणि स्पष्ट विचारधारा आवश्यक आहे. भाजप आणि शिवसेना महायुती ही हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास या तिन्ही मुद्द्यांवर ठामपणे काम करत असून, नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि समाजहितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी काळात पक्ष अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

