Explore

Search

December 25, 2025 8:14 pm

ठाकरे बंधूंची युती जाहीर, मात्र भाजपाचा दुहेरी धक्का !

पनवेल : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतरांचे सत्र सुरू झाले असून अनेक पक्षांची स्थानिक व राज्य पातळीवरील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. अशाच वातावरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे युतीची घोषणा करत महायुतीविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या युतीमुळे दोन्ही पक्षांची संघटनात्मक ताकद वाढेल, असा दावा करण्यात येत असतानाच दुसरीकडे भाजपाने या दोन्ही पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. येथील माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे, शितलताई बोडारे तसेच ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्व नेत्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजपाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप राजानी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पनवेलमध्येही मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेल शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष रोहन गवळी आणि पदाधिकारी केनेथ देवासगयम यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, भाजपाची विकासकेंद्रीत, पारदर्शक आणि कार्यक्षम कार्यशैली पाहून हे पदाधिकारी पक्षात दाखल झाले आहेत.

एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे विरोधी राजकारणाला नवे बळ मिळाल्याचे चित्र असताना, दुसरीकडे भाजपामध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशांमुळे ठाकरे गट आणि मनसेला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये या घडामोडींचा नेमका कसा परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर