पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. अजित पवार गटासोबत आघाडीच्या शक्यतेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक सूर लावला असला, तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून याला तीव्र विरोध करण्यात आला आहे. दोन्ही पवार गट एकत्र आले, तर ठाकरे गट सोबत राहणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने मांडली आहे. त्यामुळे ही संभाव्य युती शरद पवार गटाच्या पुरोगामी राजकीय भूमिकेशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांशी निष्ठावान राहिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडींमुळे अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात पदाचा राजीनामा दिल्याने या नाराजीला उघड स्वरूप आले आहे. सुप्रिया सुळे यांनी जगताप यांच्याशी सुमारे सहा तास सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले असले, तरी आघाडीबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडणे टाळले आहे.
जागावाटप आणि स्थानिक समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची असल्याचे सूचक वक्तव्य सुळे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांपूर्वीच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवी समीकरणे आकार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
