मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले तब्बल 12 नगरसेवक काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजिवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड हे नगरसेवक आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी संजीव नाईक आणि दीपक म्हात्रे यांचीही उपस्थिती असणार आहे.
अंबरनाथ शहरात याआधी ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन करण्यात आली होती. या आघाडीत भाजप, अजितदादा गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याची चर्चा राज्यभरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही रंगली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर दखल घेत या 12 नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली. या कारवाईमुळे अंबरनाथमधील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील नाराज झाले आणि पुढे अनेक राजकीय हालचालींना वेग आला.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपसोबत कोणतीही युती किंवा गुप्त समझोता झालेला नाही. निवडणूक लढवताना भाजपशी कोणताही घरोबा केलेला नाही, तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिलेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी तालुका अध्यक्षांकडून याबाबत खुलासा मागितल्याचेही नमूद केले.
अंबरनाथमधील 12 नगरसेवकांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा राजकीय झटका मानला जात असून, निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षनिष्ठा आणि शिस्त पाळत नसल्याचा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या घडामोडींचे राजकीय पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.

