Explore

Search

June 20, 2026 11:26 pm

शरद पवार अनभिज्ञ, बारामतीत कुटुंबीयांची खलबतं; आज सायंकाळी शपथविधीची शक्यता !

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाला अद्याप तीन दिवसही पूर्ण झालेले नसताना, राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी जात असताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. बुधवारी ही घटना घडली, गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, तर शुक्रवारी राख सावडली.

दरम्यान, शुक्रवारी रात्री बारामतीत राजकीय हालचालींनी वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती होती. उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित केलं जाईल, अशी चर्चा असतानाच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मात्र बैठकीला उपस्थित न राहता मुंबईकडे रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, आज म्हणजे शनिवारी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील राजभवनात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचंही समोर आलं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेबाबत शरद पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले,
“सुनेत्रा पवार यांच्याशी आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. शपथविधी होणार आहे, याचीही आम्हाला माहिती नव्हती. संबंधित पक्षाने काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा अधिकार आहे.”

दरम्यान, सत्तावाटपात काही महत्त्वाची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचं संकेत मिळत आहेत. यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत राज्यातील सत्तासमीकरणं नव्याने आकार घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर