Explore

Search

May 14, 2026 11:59 am

अण्णामलाईंच्या ‘बॉम्बे’ वक्तव्यावर वाद अनावश्यक; त्याकडे फार लक्ष देऊ नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. “मराठी महापौर हवा”, “मराठी वाचवा” अशा घोषणा देत अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे आणला आहे. या दरम्यान भाजपकडून देशभरातील विविध स्टार प्रचारक मुंबईत दाखल झाले असून उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिण भारतातील नेतेही प्रचारात सहभागी झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई मुंबईत प्रचारासाठी आले होते. मात्र प्रचारादरम्यान त्यांनी मुंबईचा उल्लेख “बॉम्बे” असा करत, “बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी” असे विधान केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी या वक्तव्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आणि हा मुद्दा चांगलाच तापला. या संपूर्ण प्रकरणावर भाजपची अधिकृत भूमिका काय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी अण्णामलाई यांच्या विधानावर फारसं गांभीर्याने घेऊ नका, असा सल्ला दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, “अण्णामलाई हे काही राष्ट्रीय नेते नाहीत. ते तामिळ भाषिकांच्या आग्रहाखातर मुंबईत प्रचारासाठी आले होते. त्यांना हिंदी नीट येत नाही. बोलताना सवयीने शब्द निघतात. मलाही तामिळनाडू दौऱ्यात चेन्नईऐवजी आधी मद्रास असं बोलून चूक झाली होती.” त्यामुळे या विधानावर अनावश्यक वाद निर्माण करू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी फडणवीस यांनी मिश्किल टोलाही लगावला. “बॉम्बेचं मुंबई करणारे आम्हीच आहोत. जर आम्हीच ते केलं असेल, तर मुंबईचं पुन्हा बॉम्बे करून आम्हाला काय मिळणार आहे? आमचे मतदार किंवा पक्षातील कार्यकर्ते तरी त्याला समर्थन देतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विषय नसतील तेव्हा अशा मुद्द्यांना हवा दिली जाते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, मराठी अस्मिता, मुंबईची ओळख आणि भाषेचा मुद्दा यावरून आगामी महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर