मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील तब्बल २९ महानगरपालिकांसाठी आज बहुप्रतिक्षित मतदान प्रक्रिया पार पडत असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक मान्यवर आणि दिग्गज व्यक्तींनी आज मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांनी सकाळी वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासह मतदान केले. यानंतर त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन केले.
क्रिकेटमधील प्रत्येक धाव जशी सामन्याचा निकाल ठरवते, त्याचप्रमाणे लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते, असे सांगत सचिन तेंडुलकर म्हणाले की, “आपल्याला हवा असलेला निकाल मिळवायचा असेल तर घरात बसून चालणार नाही. मतदान केंद्रावर येऊन बटण दाबणं गरजेचं आहे. आपलं मत मांडण्याची हीच एक संधी आहे.” ते पुढे म्हणाले, “प्रत्येक मताचा मोठा प्रभाव असतो. तुमचा विचार, तुमचं मत मतदानातून व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे. जसा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो, तसंच प्रत्येक मतही महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं.”
दरम्यान, १५ जानेवारी रोजी होत असलेली ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह २९ महापालिकांसाठी मतदान जाहीर केले आहे. या सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये सुमारे ३.४८ कोटी मतदार असून २,८५९ नगरसेवक पदांसाठी हजारो उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राज्य सरकारकडून आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या हाय-व्होल्टेज निवडणुकीची मतमोजणी उद्या, १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

