पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या जागावाटपाच्या हालचालींना वेग आला असताना, एका महत्त्वाच्या बैठकीतून शिंदे सेनेचे स्थानिक नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागावाटप आणि आगामी रणनीती ठरवण्यासाठी शिंदे सेना आणि भाजप यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तर शिंदे सेनेच्या वतीने मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.मात्र, पुण्यातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा मानले जाणारे आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून धंगेकर यांच्या उपस्थितीला विरोध करण्यात आला होता. याच कारणामुळे शिंदे सेनेने आपल्या स्थानिक नेत्यालाच डावलत भाजपसोबत बैठक पार पाडल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता थेट वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जात असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचीही चर्चा आहे. धंगेकर यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याने शिंदे गटात ‘एकसूत्रता आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी आपल्याला अद्याप कोणतेही निमंत्रण आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मला बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. निमंत्रण आलेले नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला आणखी तोंड फुटले असून, शिंदे गटातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
पुणे महापालिका निवडणूक ही राज्यातील सर्वांत महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक मानली जाते. अशा वेळी जागावाटपाबाबत स्थानिक नेत्यांना डावलले जाणे आणि मित्र पक्षाच्या दबावामुळे निर्णय घेण्यात येणे, हे भविष्यात शिंदे सेना–भाजप युतीसाठी अडचणीचे ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.आता या प्रकरणावर शिंदे गटाचे नेतृत्व काय भूमिका घेते, तसेच धंगेकर यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
