पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) शहराध्यक्ष तथा मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार संजोग वाघेरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत दुपारी १२ वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
संजोग वाघेरे सकाळीच पिंपरी-चिंचवडहून मुंबईकडे रवाना झाले असून त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा वाघेरे यांनी केला आहे. या प्रवेशानंतर संबंधित नेत्यांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रभागातील भाजपमधील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ही नाराजी पक्षाचे वरिष्ठ नेते निश्चितपणे दूर करतील, असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.
पक्षप्रवेशाआधी भावना व्यक्त करताना संजोग वाघेरे म्हणाले,
“आदरणीय उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दलचा आदर आजही माझ्या मनात आहे. मात्र पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या, विकासाचे प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा पाहता, केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपसोबत राहून हे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील, असा विश्वास आहे.”तसेच त्यांनी सांगितले की, “माझ्यासोबत काही नगरसेवक आणि पदाधिकारीही आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी माझी पत्नी रिंगणात असणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
संजोग वाघेरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना सुमारे सहा लाख मते मिळाली होती, मात्र महायुतीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता.राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे की, २०२९ ची लोकसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यास संजोग वाघेरे हे मावळमधून भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत वाघेरे यांची पत्नी किंवा मुलगा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो.
संजोग वाघेरे : राजकीय प्रवास थोडक्यात
- दिवंगत माजी महापौर भिकू वाघेरे यांचे पुत्र
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन वेळा नगरसेवक
- पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर
- स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले
- राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग ८ वर्षे शहराध्यक्ष
- शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख
- २०२४ पूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
- मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभव
- १८ डिसेंबर रोजी ठाकरे गटाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा
- आज भाजपमध्ये प्रवेश
एकूणच संजोग वाघेरे यांच्या भाजप प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

