Explore

Search

December 25, 2025 8:09 pm

महापालिका निवडणुकांपूर्वी शरद पवार गटाला धक्क्यांची मालिका; प्रशांत जगतापांचा राजीनामा, राहुल कलाटे भाजपमध्ये !

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांच्या चर्चा रंगात आल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शरद पवार गट महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये बैठका सुरू असल्या तरी शरद पवार गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.

अजित पवार गटासोबत आघाडी नको, अशी ठाम भूमिका घेत शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. जगताप यांनी यापूर्वीच दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीला उघड विरोध केला होता. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे हा अंतर्गत वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.हे संकट एवढ्यावरच थांबलेले नाही. पिंपरी-चिंचवडमध्येही शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे उमेदवार राहिलेले राहुल कलाटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. 2025 च्या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी शंकर जगताप यांच्या विरोधात लढत दिली होती. ते शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते म्हणून ओळखले जात होते.

आता शरद पवार गटाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका अगदी तोंडावर असताना एकामागोमाग एक नेते पक्ष सोडत असल्याने शरद पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर ते लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. एकीकडे जगताप तर दुसरीकडे राहुल कलाटे यांच्या बाहेर पडण्यामुळे शरद पवार गटाला दुहेरी फटका बसल्याचे मानले जात असून याचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर