शिरूर :पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरात मोटारसायकलच्या फायनान्स हप्त्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एक ओळखीच्या आरोपीसह तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आंधळगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील रहिवासी किरण सावळा फुलारे ( वय २३ ) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास शिरूर शहराच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ असलेल्या सुनिल वडेवाले दुकानाजवळ ही घटना घडली. फिर्यादी किरण फुलारे यांच्याकडील मोटारसायकलच्या फायनान्सचे हप्ते थकले असल्याच्या कारणावरून आरोपी जाधव व त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी फुलारे यांना अडवले. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी फुलारे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीदरम्यान मुख्य आरोपी जाधव याने काचेची बाटली फुलारे यांच्या डोक्यात फोडली, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींपैकी एका अनोळखी इसमाने हातात घेतलेल्या दगडाने फुलारे यांच्या उजव्या खांद्यावर प्रहार करत त्यांना जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर जखमी किरण फुलारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९११/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२)(३), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद २९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आली. सदर गुन्हा पोलीस हवालदार सुद्रीक यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भगत करत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, फरार असलेल्या तीन अनोळखी आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.
दरम्यान, दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे शिरूर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
