भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली असून जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) सध्या 4.18 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचला आहे. पुढील काही वर्षांत ही प्रगती कायम राहिल्यास 2030 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मजबूत देशांतर्गत मागणी, पायाभूत सुविधा विकास आणि रचनात्मक सुधारणांमुळे भारत सध्या जगातील वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या वास्तविक GDP मध्ये 8.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. याआधी पहिल्या तिमाहीत ही वाढ 7.8 टक्के होती, तर मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 7.4 टक्के वाढ झाली होती. गेल्या सहा तिमाहींमधील ही सर्वाधिक वेगवान वाढ मानली जात आहे.
जागतिक व्यापारात अस्थिरतेचे वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि मजबूत पायावर उभी आहे. सरकारच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारताचा GDP सुमारे 7.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून चीन दुसऱ्या आणि जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे.
जागतिक आर्थिक संस्थांनीही भारताच्या विकासक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने 2026 साठी भारताचा विकास दर 6.5 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजच्या मते 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.4 टक्क्यांनी, तर 2027 मध्ये 6.5 टक्क्यांनी वाढेल. या पार्श्वभूमीवर G-20 देशांमध्ये भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 2025 साठी भारताचा विकास दर 6.6 टक्के आणि 2026 साठी 6.2 टक्के असा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (OECD) ने 2025 साठी 6.7 टक्के आणि 2026 साठी 6.2 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. एस अँड पीने चालू आर्थिक वर्षात 6.5 टक्के आणि पुढील वर्षात 6.7 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
आशियाई विकास बँकेने (ADB) 2025 साठी भारताचा विकास दर वाढवून 7.2 टक्के केला आहे, तर फिचने मजबूत ग्राहक मागणीचा हवाला देत आर्थिक वर्ष 2026 मध्ये 7.4 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. महागाई दर नियंत्रणात असणे, बेरोजगारी दरात घट, निर्यातीत सुधारणा, स्थिर आर्थिक परिस्थिती आणि शहरी भागातील वाढती विक्री यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाला बळ मिळत आहे.

