महाराष्ट्रातील अग्रगण्य व विश्वासार्ह वृत्तपत्र दर्पण यांच्या वतीने तसेच हिंदी मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ साठी पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संतोष सातकर ( पत्रकार ) यांची निवड करण्यात आली आहे.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान दर्पण रत्न पुरस्कार देऊन करण्यात येतो. त्याच परंपरेनुसार यावर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिक, निर्भीड व समाजोपयोगी लेखन व कार्य केल्याबद्दल संतोष सावकर यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. संतोष सातकर हे मूळचे उद्योजक असले तरी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, शैक्षणिक विषय, ग्रामीण भागातील समस्या, सामान्य जनतेचे प्रश्न यांना सातत्याने वाचा फोडली आहे. त्यांच्या लेखनात समाजभान, सत्यता व लोकहिताचा स्पष्ट दृष्टिकोन दिसून येतो. त्यामुळे त्यांचे कार्य पत्रकारिता क्षेत्रात विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून मिळणारा दर्पण रत्न पुरस्कार हा पत्रकारांसाठी प्रेरणादायी मानला जातो. या पुरस्काराच्या घोषणेमुळे संतोष सातकर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मित्रपरिवार, शिक्षक बांधव, पत्रकार संघटना व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने समाजहितासाठी लेखन व कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. लवकरच होणाऱ्या भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावेळी विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात येणार आहे.
