Explore

Search

February 9, 2026 5:09 am

पुणे महापालिका निवडणूक तापली: आंदेकर कुटुंबाला तिकीट दिल्याने वाद, अजित पवारांचे स्पष्टीकरण !

पुणे : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून दिलेल्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना तिकीट देण्यात आल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, “समजा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्याच्या पत्नीचा, मुलाचा किंवा सुनेचा त्यात काय दोष? एखाद्याने गंभीर गुन्हा केला म्हणून संपूर्ण कुटुंब जबाबदार ठरत नाही. ही मानसिक विकृती आहे.” उमेदवारीच्या यादीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, मित्र पक्षांना जागा सोडण्यात आल्या असून, त्या जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची हा संबंधित पक्षाचा निर्णय आहे. दरम्यान, अजित पवार यांनी यापूर्वी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत “माझ्याकडे पुरावे आहेत” असा दावा केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पलटवार करत, महायुतीत अजित पवार यांचा समावेश करताना विचार करायला हवा होता, असे विधान केले होते.

या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “रवींद्र चव्हाण हे मोठ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.” याचबरोबर त्यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावरून भाजपवरही जोरदार टीका केली आहे. एकीकडे उमेदवारीवरून सुरू असलेला वाद आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पुणे महापालिका निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हं दिसत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर