Explore

Search

February 9, 2026 8:09 am

रांजणगाव जिल्हा परिषद गटात रंगतदार लढत; रेखा बांदल आघाडीवर, शिंदे गट सज्ज !

शिक्रापुर :  तळेगाव ढमढेरे–रांजणगाव जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटाकडे संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रमुख दोन राजकीय गटांमधील चुरस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

एकीकडे भारतीय जनता पक्षचे शिरूर तालुका अध्यक्ष जयेश शिंदे यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांनी गटातील विविध गावांमध्ये भेटीगाठी वाढवत प्रचाराची पायाभरणी केली असून कार्यकर्त्यांच्या बैठका, मतदारांशी संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा यावर भर दिला जात आहे. जयेश शिंदे यांचा तळागाळातील कार्यकर्ते, युवक आणि विविध समाजघटकांमध्ये असलेला मजबूत संपर्क त्यांच्या गटासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मात्र दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शिरूर तालुक्यात नेहमीच चर्चेत असलेले बांदल कुटुंब पुन्हा एकदा सक्रिय झाले असून रेखा बांदल यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबली आहे. गावोगावी प्रत्यक्ष भेटी, महिलांशी संवाद, ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा आणि स्थानिक विकासकामांचा आढावा घेत त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, रेखा बांदल यांनी नागरिकांच्या श्रद्धेला हात घालत उज्जैन यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून यामुळे त्यांचा जनसंपर्क अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक मुद्द्यांच्या आधारे प्रचार करत त्यांनी मतदारांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

एकूणच तळेगाव ढमढेरे–रांजणगाव जिल्हा परिषद गटात बांदल विरुद्ध शिंदे असा चुरशीचा सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. दोन्ही बाजूंनी तयारीला वेग आला असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होणार आहे. कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर