रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : परिसरात तरुण-तरुणींना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बापूसाहेब शिंदे, पुणे जिल्हा युवासेना अध्यक्ष, यांनी उघडकीस आणला असून त्यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे अडकून पडलेल्या सर्व मुला-मुलींची सुरक्षित सुटका करण्यात आली. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना राजू शिंदे (वय 21, रा. पानमळा, शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवध कलीम बिनसाद (रा. श्रीरामपूर) आणि ज्ञानेश्वर महादेव धायतडक (रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल आवटे (रा. श्रीरामपूर) हा तिसरा आरोपी असून तो अद्याप फरार आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील सुखकर्ता मंगल कार्यालय येथे हा प्रकार घडला. आरोपींनी एम.एस.एफ. फोर्स एजन्सीमार्फत रांजणगाव एमआयडीसीतील कंपनीत बंदोबस्ताचे काम देण्याचे आमिष दाखवले. आठ तासांचे काम व दरमहा 16 हजार रुपये पगार देण्याचे सांगत त्यांनी ड्रेस व किटच्या नावाखाली तरुणांकडून पैसे घेतले. या आमिषाला बळी पडून 37 मुले व 10 मुलींकडून एकूण 70 हजार रुपये आरोपींनी गोळा केले. मात्र, पैसे घेतल्यानंतर कोणालाही नोकरी देण्यात आली नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
हा प्रकार लक्षात येताच बापूसाहेब शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मुला-मुलींना आरोपींच्या तावडीतून सोडवले. तसेच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या पुढाकारामुळेच गुन्हा दाखल होऊन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचा पूर्वगुन्हेगारी इतिहास नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र फसवणुकीची रक्कम अद्याप जप्त करण्यात आलेली नाही.
या गुन्ह्याचा पुढील तपास महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैभव मोरे करत आहे.
