Explore

Search

February 9, 2026 9:46 am

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात वाहतुकीत मोठे बदल; १४ ते १६ जानेवारी विशेष निर्बंध लागू !

पुणे : राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या रिक्त जागांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या दिवशी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, तसेच नागरिकांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी १४ ते १६ जानेवारीदरम्यान विशेष वाहतूक नियमावली लागू केली आहे.

या कालावधीत सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील सहा प्रमुख वाहतूक विभागांतील काही मुख्य रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. विशेषतः जड वाहने आणि खाजगी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हडपसर परिसरात बदल
हडपसर भागात मतदान केंद्रांची संख्या जास्त असल्याने येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. साने गुरुजी परिसराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद राहणार असून, वाहनचालकांनी हडपसर वेस्ट अमरधाम स्मशानभूमी मार्ग, माळवाडी डी.पी. रस्ता किंवा हडपसर गाडीतळ–संजीवनी हॉस्पिटल डी.पी. रस्ता वापरण्याचे सुचवण्यात आले आहे.

कोरेगाव पार्कमध्ये निर्बंध
संवेदनशील मतदान केंद्रे आणि व्हीआयपी हालचाली लक्षात घेता, नॉर्थ मेन रोड (लेन ‘सी’) ते पाणीपुरवठा केंद्र, बंडगार्डन घाट तसेच महात्मा गांधी चौक ते मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक या मार्गांवर वाहतूक बंद राहील. पर्याय म्हणून कोरेगाव पार्क जंक्शन ते एबीसी फार्म या मुख्य रस्त्याचा वापर करता येईल.

समर्थ वाहतूक विभागात फेरबदल
पुणे स्टेशन व मध्यवर्ती पेठांना जोडणाऱ्या भागात पॉवर हाऊस चौक ते बालाजी चौक, संत कबीर चौक ते क्वार्टर गेट चौक आणि रामोशी गेट ते जुना मोठा स्टँड हे मार्ग बंद असतील. नागरिकांनी शांताई हॉटेल, बाहुबली चौक, क्वार्टर गेट चौक आणि ‘सेव्हन लव्हज’ चौक मार्गे प्रवास करावा.

विमानतळ परिसरात वाहतूक वळवली
फिनिक्स मॉलच्या मागील बाजूचा रस्ता, सॉलिटेअर इमारत आणि निको गार्डन परिसरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार आहेत. विमान नगर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक आणि दत्त मंदिर चौक मार्गे पर्यायी वाहतूक सुरू राहील.

विश्रामबाग व दत्तवाडी विभाग
विश्रामबागेत पुरम चौक ते टिळक चौकदरम्यान वाहतूक बंद असून, शास्त्री रस्त्याने दांडेकर पुलामार्गे प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दत्तवाडी भागात बाजीराव रस्त्यावरील सनस पुतळा ते ना. सी. फडके चौक तसेच सारसबाग खाऊ गल्ली मार्ग बंद राहील. या ठिकाणची वाहतूक अप्पा बळवंत चौक (ABC) आणि पुरम चौकातून वळवण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या काळात नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर