मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच भाजप पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या हाती घेतली आहे. विशेषतः मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने एकत्रितपणे सत्ता संतुलन आपल्या बाजूने झुकवले आहे. बीएमसी निवडणुकीत या युतीने एकूण 118 जागा जिंकल्या असून, त्यापैकी भाजपला 89 तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले.
या निकालानंतर भाजपकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या ‘रसमलाई’ हा शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेन्ड करत असून, त्यामागे निवडणूक प्रचारादरम्यान घडलेला एक राजकीय किस्सा चर्चेत आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात तामिळनाडू भाजपचे नेते के. अन्नामलाई मुंबईत प्रचारासाठी आले होते. त्या वेळी राज ठाकरे यांनी एका सभेत अन्नामलाई यांच्या नावावरून उपरोधिक टीका करत ‘भाजप आता रसमलाई बोलत आहे’ असा टोमणा मारला होता. त्यामागचा उद्देश महाराष्ट्रातील निवडणुकीत दक्षिण भारतातील नेत्यांच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा होता.

मात्र निकालानंतर चित्र पूर्णपणे बदलले. अन्नामलाई यांनी ज्या-ज्या भागात प्रचारसभा घेतल्या, त्या भागांत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर मनसेची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. याच पार्श्वभूमीवर भाजप ओडिशाचे नेते पी. सी. मोहन यांनी इन्स्टाग्रामवर रसमलाईचा फोटो शेअर करत, “काही रसमलाई ऑर्डर केली” अशी मिश्किल पोस्ट टाकली.
यानंतर सोशल मीडियावर #Rasmalai आणि #Annamalai हे हॅशटॅग ट्रेन्ड करू लागले. अनेकांनी या घटनेवरून मिम्स तयार करत राजकीय टोलेबाजीला उधाण आणले आहे. एकूणच, निवडणूक निकालानंतर ‘रसमलाई’ हा शब्द भाजपच्या विजयाचे आणि मनसेच्या पराभवाचे प्रतीक बनल्याचे चित्र सध्या सोशल मीडियावर दिसत आहे.
