Explore

Search

February 9, 2026 6:42 am

मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी हालचालींना वेग; भाजपकडून नगरसेवकांना ‘मुंबई सोडू नका’ आदेश, ठाकरे गटाची राज ठाकरेंशी भेट आज !

मुंबई : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 89 तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्याने महायुतीला बहुमत मिळाले असून मुंबई महापालिकेवर भगवा फडकण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.

तथापि, सत्तास्थापनेसाठी भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेची साथ आवश्यक असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांची वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केल्याने ‘हॉटेल पॉलिटिक्स’ची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, भाजपनेही सावध भूमिका घेतली असून नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील आठ दिवस मुंबईबाहेर न जाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने सत्तास्थापनेला काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्या काळात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असल्याने नगरसेवकांनी एकत्र राहावे, बाहेरगावी जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महापौर कोण होणार, हा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आरक्षण सोडत आणि मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यामुळे या निर्णयाला आणखी काही दिवस लागू शकतात.

दुसरीकडे, ठाकरे गट आणि मनसे यांची युतीही चर्चेत आहे. बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटाला 65 तर मनसेला 6 जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीनंतर मनसेच्या नगरसेवकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आता आज सकाळी 11 वाजता ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीकडे मुंबईच्या राजकारणात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर