Explore

Search

February 4, 2026 6:12 am

जनसंघाच्या विचारवृक्षातून उभा राहिलेला भाजप आज जगातील सर्वात मोठा पक्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारतीय जनसंघाच्या स्थापनेला यंदा 75 वर्षे पूर्ण होत असून, या वाटचालीमागे लाखो कार्यकर्त्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदान दडलेले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसंघाच्या कार्यकर्त्यांना आदरांजली वाहिली. जनसंघाच्या विचाररूपी वटवृक्षातूनच भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला असून, आज भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे, असा गौरवोद्गार त्यांनी काढला.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांच्या निवडीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना, “मी तीन वेळा देशाचा पंतप्रधान झालो, लहान वयात मुख्यमंत्री झालो, जवळपास 25 वर्षे सरकारचा प्रमुख म्हणून काम केलं; मात्र या सर्वांपेक्षा मोठा सन्मान म्हणजे मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे,” असे स्पष्ट केले. “आजही मी स्वतःला कार्यकर्ता मानतो आणि नितीन नबीन हे माझे बॉस आहेत,” असे सांगत त्यांनी नव्या अध्यक्षांचे खुलेपणाने कौतुक केले.

नितीन नबीन यांच्यावर केवळ भाजपच नव्हे, तर एनडीएचीही मोठी जबाबदारी

नितीन नबीन यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांची जबाबदारी केवळ भाजपचे संघटन सांभाळण्यापुरती मर्यादित नाही, तर एनडीएतील सर्व सहकारी पक्षांमध्ये समन्वय राखण्याची महत्त्वाची भूमिका देखील त्यांना निभवावी लागणार आहे.

“नितीन नबीन यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक जण त्यांच्या साधेपणा, सरळपणा आणि सहजतेची आवर्जून चर्चा करतो,” असे सांगत त्यांनी युवा मोर्चाची जबाबदारी, विविध राज्यांचे प्रभारी म्हणून काम आणि बिहार सरकारमधील प्रशासकीय अनुभव यांचा उल्लेख केला.

“प्रत्येक जबाबदारीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आणि त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्यांना त्यांच्या कार्याचा अभिमान वाटला आहे,” असेही मोदी म्हणाले.

21 व्या शतकातील निर्णायक कालखंडात नवे नेतृत्व

भविष्यातील वाटचालीकडे लक्ष वेधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21 व्या शतकातील पहिली 25 वर्षे पूर्ण झाली असून, येणारी 25 वर्षे भारतासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. याच कालखंडात ‘विकसित भारत’ घडणार आहे आणि या ऐतिहासिक टप्प्यावर नितीन नबीन भाजपचा वैचारिक वारसा पुढे नेतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नितीन नबीन यांच्या पिढीबाबत बोलताना मोदी म्हणाले, “ते मिलेनियल पिढीचे प्रतिनिधी आहेत. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. रेडिओवर सूचना ऐकण्यापासून ते आज एआयचा वापर करणाऱ्या पिढीपर्यंतचा प्रवास त्यांनी अनुभवला आहे. त्यांच्याकडे ऊर्जा आहे, संघटनात्मक अनुभव आहे आणि ही ताकद पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरेल.”

अध्यक्ष बदलतात, पण भाजपचे आदर्श अढळ भाजपच्या वैचारिक भूमिकेवर ठाम मत मांडताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आमच्याकडे अध्यक्ष बदलतात, नेतृत्व बदलतं; पण आदर्श बदलत नाहीत. दिशा बदलत नाही. भाजप हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर एक संस्कार आहे, एक परिवार आहे.”

“आमच्याकडे मेंबरशिपपेक्षा रिलेशनशिपला अधिक महत्त्व आहे. पद प्रक्रियेतून येतं, पण कार्यभार आयुष्यभराची जबाबदारी असतो,” असे सांगत त्यांनी भाजपच्या संघटनात्मक संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

देशातील लोकशाहीबाबत बोलताना मोदी म्हणाले की, भारतासारख्या देशात जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अस्तित्वात आहे, ही बाब भारतातील लोकशाही किती मजबूत आहे, याचेच प्रतीक आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर