नवी दिल्ली : भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाची सूत्रे अशा काळात हाती घेतली आहेत, जेव्हा पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असम, पुदुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या पाचही राज्यांमध्ये भाजपसाठी निवडणूक लढत सोपी नसल्याने नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारताच संघटनात्मक बदल आणि जबाबदाऱ्यांचे वाटप झपाट्याने सुरू केले आहे.
या राज्यांपैकी भाजपसाठी सर्वात अवघड आव्हान केरळचे मानले जात आहे. केरळमधील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणारे विनोद तावडे संघटन बांधणीतील कुशल रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. बिहार विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आता केरळमध्येही ते भाजपसाठी नवा इतिहास घडवू शकतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मदतीसाठी कर्नाटकच्या नेत्या शोभा करंदलाजे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, इतर निवडणुकांसाठीही भाजपने प्रमुख नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आशिष शेलार यांच्याकडे तेलंगणातील नगर परिषद निवडणुकांची धुरा देण्यात आली असून, अशोक परनामी आणि रेशा शर्मा यांची सहप्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच ज्येष्ठ नेते राम माधव यांच्यावर ग्रेट बंगळुरु महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली असून, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय हे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
केरळमध्ये सत्ता मिळवण्याचा मार्ग भाजपसाठी अत्यंत खडतर आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांचा प्रभाव, तसेच यूडीएफ आणि एलडीएफ या दोन आघाड्यांचे वर्चस्व, हे मोठे अडथळे मानले जातात. तरीही भाजपचा मतांचा टक्का सातत्याने वाढताना दिसतो आहे. 2014 मध्ये 14 टक्क्यांवर असलेली मतांची टक्केवारी 2019 मध्ये 16 टक्क्यांपर्यंत पोहोचली, तर 2024 मध्ये ती सुमारे 20 टक्क्यांपर्यंत गेली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, केरळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपला किमान 30 टक्क्यांहून अधिक मते मिळवावी लागणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर नितीन नबीन यांनी केरळसाठी सर्वात कठीण आणि महत्त्वाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवली आहे. आगामी निवडणुकीत ही रणनीती भाजपसाठी कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

