शिरूर : रांजणगाव एमआयडीसी परिसरात कामगारांना रस्त्यात अडवून मोबाईल फोन लुटणाऱ्या तिघा आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरासमोरून पायी जाणाऱ्या सुरेश गलाबाई पारगील ( रा. पाचामोडी, ता. सांगावाडा, जि. म्हैसाघर, राज्य गुजरात ) यांना तीन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवर येत रस्त्यात अडवले. शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या जवळील सुमारे ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी परिसरात कामगारांचे मोबाईल लुटीचे प्रकार वाढत असल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी भेट देऊन तसेच स्थानिक नागरिकांकडून माहिती घेत तपास पथकाने कौशल्यपूर्ण कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची निलेश चंद्रकांत पवार (वय २८, रा. भोंद्रे कान्हूर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), मोहन विठ्ठल भोगे (वय २८, रा. प्रितम प्रकाशनगर, शिरूर, जि. पुणे), अभिजीत चंद्रकांत पवार (वय ३५, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर, जि. पुणे) अशी आहेत.
तपासादरम्यान आरोपींनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण दोन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल तसेच अन्य पाच मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेले मोबाईल परत मिळाल्याने एमआयडीसीतील कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहेत.
