रिसोड ( तालुका प्रतिनिधी ) :रिसोड शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली असून, येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वे गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील एक १६ वर्षीय शालेय विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाली होती. पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता, तिला एका युवकाने फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत. बेपत्ता विद्यार्थिनी व संबंधित युवकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच अल्पवयीन मुलीचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

