Explore

Search

October 24, 2026 3:52 pm

उत्तमचंद बगडीया महाविद्यालयात ‘राजकारण आणि महिला नेतृत्व’ विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न !

रिसोड | प्रतिनिधी : रिसोड येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित, काशीबाई मगनलालजी बगडीया बहुउद्देशीय अल्पसंख्यांक सोसायटी संचलित स्थानिक उत्तमचंद बगडीया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘राजकारण आणि महिला नेतृत्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. आधुनिक लोकशाही व्यवस्थेत महिलांचे राजकीय सक्षमीकरण, प्रशासकीय सहभाग आणि निर्णय प्रक्रियेतील योगदान यांवर या कार्यशाळेत सखोल विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन व प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका मा. सौ. सरिताताई सतिश बगडीया उपस्थित होत्या. या सत्रात प्रमुख मार्गदर्शिका तथा बीजभाषक म्हणून प्रा. डॉ. मंगल खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. के. के. बुधवंत, कार्यशाळेचे आयोजक तथा राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर, द्वितीय सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अतुल खोटे , संस्थेचे प्रतिनिधी श्री विजेश बगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, संविधानाने महिलांना समान अधिकार दिले असले तरी प्रत्यक्ष राजकीय पटलावर महिलांचा प्रभावी सहभाग वाढवणे आणि विद्यार्थिनींमध्ये राजकीय सजगता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आपल्या अभ्यासपूर्ण बीजभाषणात प्रा. डॉ. मंगल खेडेकर यांनी भारतीय राजकारणातील महिलांच्या वाटचालीचा ऐतिहासिक व वर्तमानातील आढावा मांडला. त्या म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यापासून चालत आलेला नेतृत्वाचा वारसा आजच्या युवतींनी समर्थपणे पुढे नेला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणापासून ते संसद स्तरापर्यंत महिलांनी मिळवलेल्या संधींचे रूपांतर प्रत्यक्ष प्रभावात करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात मा. सौ. सरिताताई बगडीया यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना राजकारणाकडे केवळ सत्ताकारण म्हणून न पाहता समाज परिवर्तनाचे साधन म्हणून पाहण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “केवळ संख्येत वाढ होणे म्हणजे सक्षमीकरण नव्हे; तर महिलांनी स्वतः निर्णय घेणारे, धोरण ठरवणारे व समाजाचे प्रश्न धडाडीने मांडणारे नेतृत्व बनले पाहिजे. घर आणि समाज अशा दोन्ही स्तरांवर समतोल साधत महिला उत्तम प्रशासकीय आणि राजकीय भूमिका पार पाडू शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी आणि नेतृत्वासाठी पुढे यावे.”

दुपारच्या द्वितीय तांत्रिक सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. के. के. बुधवंत यांनी भूषवले. या सत्रात पुष्पादेवी पाटील महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अतुल खोटे यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या राजकीय सहभागासमोरील आव्हाने, कायदेशीर तरतुदी आणि समकालीन राजकीय घडामोडींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. के. के. बुधवंत यांनी महाविद्यालयात अशा प्रकारच्या वैचारिक व समाजोपयोगी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो, असे नमूद केले. याप्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी श्री विजेश बगडिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय आयोजकांच्या वतीने करून देण्यात आला, तर शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली. या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्रा. टिकार, प्रा. नरवाडे,प्रा.राऊत प्रा. बाजड, प्रा वाघ ,प्रा मनवर,प्रा.जाधव,प्रा.गाडेकर प्रा. बोंडे मॅडम, डॉ. काळे मॅडम प्रा.वानरे मॅडम, प्रा. गायकवाड मॅडम,श्री संतोष घुगे ,श्री पुरी, सौ नरवाडे, सुनील चऱ्हाटे तसेच रिसोड परिसरातील विविध महाविद्यालयांमधून आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर