महाड (प्रतिनिधी) : महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरवाडी येथे भावकीच्या देवावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर धारदार कटरने वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे बिरवाडी येथील सिद्धी कॉम्प्लेक्स परिसरात ही घटना घडली. गोपाळ गंगाराम कदम (वय ५२) हे टेलरिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते या परिसरात भाड्याने राहत आहेत.
या प्रकरणातील आरोपी भीमराव नारायण कदम (वय ४५), शोभा भीमराव कदम (वय ४२, रा. आदर्शनगर, बिरवाडी), हेमंत कृष्णा केळशीकर (वय ३२) आणि कृष्णा पांडुरंग केळशीकर (रा. ढालकाठी) हे गोपाळ कदम यांच्या घरी गेले होते. त्यावेळी भावकीच्या देवावरून त्यांच्यात वादविवाद झाला. या वादादरम्यान धागा कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार कटरने गोपाळ कदम यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार प्रवीण राठोड आणि पोलीस हवालदार कोंडाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींना ताब्यात घेतले.
जखमी गोपाळ कदम यांच्या फिर्यादीवरून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२९(४), ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड विधानातील कलम ४४८, ३२६, ३२३, ५०४ आणि ३४ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लांगे करीत आहे.

