गडचिरोली – आहेरी | प्रतिनिधी : तेलंगणा राज्याच्या समृद्ध सांबतकम्मास्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला बतकम्मा उत्सव दक्षिण गडचिरोली परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात महिला आणि युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, पारंपरिक लोकगीते आणि सामूहिक नृत्यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाला.
बतकम्मा हा तेलंगणा राज्यातील महिलांचा पारंपरिक फुलांचा उत्सव असून, यामध्ये गौरी देवीची पूजा केली जाते. झेंडू, शेवंती, तंगेडू यांसह विविध हंगामी फुलांची रचना करून आकर्षक बतकम्मा तयार केले जातात. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीची पूजा, नैवेद्य, पारंपरिक लोकगीते आणि सामूहिक नृत्याचे आयोजन केले जाते.
उत्सवाच्या प्रत्येक दिवशी महिलांचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला आणि युवतींनी फुलांनी सजवलेल्या बतकम्माभोवती फेर धरत लोकगीतांच्या तालावर नृत्य केले. त्यामुळे परिसरात आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
उत्सवाच्या अंतिम दिवशी ‘सद्दुला बतकम्मा’ साजरी करून स्थानिक परंपरेनुसार फुलांचे विसर्जन करण्यात येते. या उत्सवातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच महिलांमधील एकोपा, सामाजिक बंधुभाव आणि पारंपरिक सांस्कृतिक वारशाचे जतन केले जाते.दक्षिण गडचिरोली परिसरात मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या या उत्सवामुळे तेलंगणा आणि सीमावर्ती भागातील सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

