कल्याण : राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवणारे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप आगामी महापालिका निवडणुका मात्र महायुतीच्या बॅनरखाली एकत्र लढणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र या निर्णयाला भाजपच्या स्थानिक पातळीवर विरोध सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत. भाजपच्या कोपरी मंडळाने शिवसेना (शिंदे गट) सोबतच्या युतीवर अधिकृत हरकत नोंदवली आहे.
कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या शिवसेनेने यापूर्वी भाजपविरोधात केलेल्या राजकीय कुरघोडींचा सविस्तर आढावा सादर केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन पोटे, माजी नगरसेविका जानवी पोटे हे दोघेही शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच नुकतेच सचिन पोटे यांनी यापूर्वी पक्षांतर्गत दबाव आणि नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडी सोबत जाहीररीत्या जारी गेले नसले तरी देखील त्यांच्यासोबत अप्रत्यक्ष रित्या असलेले राज्य ठाकरे यांच्या पक्षाचे नेते कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई यांचाही शिवसेनेत प्रवेश होण्याची जोरदार चर्चा आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात आजचा पक्षप्रवेश सोहळा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
कल्याण-डोंबिवली आणि ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभावक्षेत्र मानला जातो. मात्र या भागातच शिवसेना-भाजप यांच्यात थेट राजकीय स्पर्धा असल्याने महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकदिलाने काम करतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे गटाला रोखणे हा महायुतीचा मुख्य उद्देश असला, तरी स्थानिक नाराजी आणि अंतर्गत मतभेद युतीसाठी अडचणीचे ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
