तळेगाव ढमढेरे : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होत असतानाच, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले आहे. सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या या गटात इच्छुकांची गर्दी असली, तरी भारतीय जनता पार्टीकडून रेश्माताई शिंदे यांचे नाव आघाडीवर असून, त्यांच्याच उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत उतरल्याचे चित्र आहे.
पक्षासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या रेश्माताई शिंदे यांना यावेळी संधी न दिल्यास अन्याय होईल, असा सूर थेट कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ‘निष्ठेला न्याय द्या’, अशी मागणी करत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. रेश्माताई शिंदे यांचे पती जयेश शिंदे, शिरूर तालुका भाजप अध्यक्ष म्हणून पक्षसंघटना बळकट करण्यात आघाडीवर आहेत. बूथपासून तालुक्यापर्यंत संघटनात्मक ताकद उभी करताना त्यांनी पक्षाचा विचार गावागावांत पोहोचवला. त्यामुळे शिंदे कुटुंब हे भाजपचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. शिंदे यांचा पक्षाशी असलेला एकानिष्ठापणा तसेच वरिष्ठ यांच्याशी असलेले सबंध त्यांना उमेदवारीसाठी फायद्याची ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत तळेगाव, रांजणगाव सांडस परिसरात विकासकामांचा पाठपुरावा, नागरी प्रश्नांवर थेट हस्तक्षेप आणि सामान्य नागरिकांसाठी सतत उपलब्ध राहण्याची भूमिका जयेश शिंदे यांनी घेतली आहे. जनतेशी असलेला थेट संवाद, स्वयं-सहायता गटांशी जोडलेपण आणि सामाजिक कामांमुळे मतदारांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
या गटात अनेक इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या असल्या, तरी रेश्माताई शिंदे यांनी केलेले शक्तीप्रदर्शन, त्यांचा भक्कम जनसंपर्क आणि पक्षाशी असलेली जुनी नाळ यामुळे इतरांची हवा फिकी पडत असल्याची चर्चा आहे. भाजप जर ‘जिंकण्याची खात्री’ आणि ‘कार्यकर्त्यांचा कौल’ या निकषांवर निर्णय घेणार असेल, तर शिंदे यांच्या नावाला पर्याय नसल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात.
आता भाजप नेतृत्व नेमका काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण गटाचे लक्ष लागले आहे. मात्र कार्यकर्त्यांचा सूर स्पष्ट आहे—यावेळी तिकीट कुणाला, याचा निर्णय केवळ समीकरणांवर नव्हे, तर रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहूनच घ्यावा. निष्ठा, ताकद आणि जनाधार यांच्या जोरावर रेश्माताई शिंदे या निवडणूक रणांगणात उतरतील, असे संकेत सध्या तरी ठळकपणे दिसत आहेत.

