Explore

Search

December 25, 2025 11:13 pm

रांजणगाव गणपतीतील सरपंच सुवर्णा वायदंडे यांच्या भाजप प्रवेशामुळे चर्चांना उधाण; विरोधकांकडून जोरदार टीका !

रांजणगाव गणपती | प्रतिनिधी : रांजणगाव गणपती येथील विद्यमान सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने रांजणगाव जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर राजकीय चर्चा रंगू लागल्या असून, विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर तसेच उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे रांजणगाव परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे संकेत मिळत होते. मात्र काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर आणि उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले होते. हे आरोप अद्याप चौकशीच्या टप्प्यात असतानाच झालेल्या राजकीय घडामोडींमुळे, “या आरोपांच्या पार्श्वभूमीवरच भाजप प्रवेश करण्यात आला का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून जोरदार टीका केली जात असून, सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, सरपंच सुवर्णा वायदंडे यांना भाजपमध्ये घेण्यामागील नेमका उद्देश काय, हा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ही रणनीती आखण्यात आली आहे का, की रांजणगाव जिल्हा परिषद गटातील समीकरणे बदलण्याचा हा प्रयत्न आहे, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

विरोधी पक्षांच्या नेते, कार्यकर्ते यांच्याकडून सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्ट मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, ‘सरपंच विकले गेले पण गाव विकू देणार नाही. असा मोठ्या अक्षरात मथळा तयार करण्यात आला असून पुढे त्यांनी असे नमूद केले आहे की, रांजणगाव ची कोट्यावधी रुपयांची 72 गुंठे जागा हडपण्याची सरपंच यांना कोट्यावधीची लाच देऊन फितूर करण्यात आले आहे. गावच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट युतीचा आम्ही जाहीर निषेध करतो. सुज्ञ जनता ही चाललेली लूट नक्की थांबवणार ! अशा लुटारू यांना गावाच्या उंबरठयावर सुज्ञ जनता उभी करणार नाही. कोट्यावधी रुपयांच्या 72 गुंठयाचा हिशोब द्यावाच लागेल.’

एकूणच सरपंच सुवर्णा वायदंडे यांच्या भाजप प्रवेशामुळे रांजणगाव गणपती परिसरातील राजकारण तापले असून, येत्या काळात या घडामोडींचे पडसाद जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांचे लक्ष आता पुढील राजकीय हालचालींकडे लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर