Explore

Search

February 9, 2026 8:07 am

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा राजकारणात शिरकाव…? गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची संधी !

पुणे : आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असले तरी, भाजप-शिवसेना युतीबाबत अद्याप स्पष्टता नाही. अनेक प्रभागांमध्ये एबी फॉर्मचे वाटप शेवटच्या क्षणापर्यंत रखडलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून काही धक्कादायक निर्णय समोर आले आहेत.

प्रभाग क्रमांक १० मधून जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून त्यांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी असलेल्या जयश्री मारणे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजा मारणे सध्या तुरुंगात असताना त्यांच्या पत्नीला थेट महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोथरूड परिसरात दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात देखील गजा मारणे गुन्हा दाखल असून नुकताच या प्रकरणातून जेलमधून जामीन झाला आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर मारणे टोळी अडचणीत आली होती. या प्रकरणानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक भूमिका घेत मारणे टोळीविरोधात थेट मैदानात उतरण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान, दुसऱ्या बाजूला कुख्यात गुंड आंदेकर देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा निवडणुकीतील सहभाग हा सध्या पुण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक २ मधून रुपाली पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच कसबा परिसरातील प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-मंडई) आणि प्रभाग क्रमांक २६ ब (गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, समता भूमी) येथूनही दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून दोन एबी फॉर्म देण्यात आले असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात सुरू असलेला वाद चर्चेत होता. रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली होती. अखेर पक्षाने त्यांना दोन एबी फॉर्म देत विश्वास दाखवला आहे.

एकूणच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यातील महापालिका निवडणूक रंगात आली असून, उमेदवारांच्या निवडीमुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर