पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असून, त्याच पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि विरोधकांच्या नव्या युतीमुळे पुण्यात मोठा राजकीय उलथापालथीचा संभव निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून तीव्र मतभेद सुरू आहेत. भाजपकडून शिवसेनेला फक्त १७ जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याने स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी रात्री उशिरा पुण्यातील एका हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची तयारी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे ही घोषणा सध्या स्थगित करण्यात आली आहे.
स्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना तातडीने पुण्यात पाठवले आहे. आज सकाळी १० वाजता पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते किमान ३५ ते ५० जागांची मागणी करत आहेत. मात्र भाजप आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास पुण्यात शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर हे नवे समीकरण तयार झाले आहे. १६५ सदस्यांच्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस १०० जागांवर निवडणूक लढवणार असून, शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा मिळाल्या आहेत. यापैकी २१ जागा मनसेला देण्यात आल्याची माहिती आहे. या नव्या आघाडीमुळे पुण्यात तिरंगी किंवा चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच वेळ उपलब्ध आहे. गेल्या सात दिवसांत पुण्यात ७४३ अर्ज दाखल झाले असून, काल एकाच दिवशी तब्बल ६९४ उमेदवारांनी अर्ज भरले. अनेक पक्षांनी अधिकृत उमेदवार याद्या जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न असला, तरी आज दुपारपर्यंत अनेक अनपेक्षित उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

