मुंबई : भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी अजित पवारांच्या महायुतीतील सहभागावरून थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवारांना महायुतीत सामील करून घेताना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला आपण यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता, असे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, अजित पवारांच्या अलीकडील काही वक्तव्यांमुळे आता त्या निर्णयाबाबत पश्चात्ताप होत असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
अजित पवारांवर असलेल्या सुमारे 70 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत चव्हाण यांनी, “मी सत्तेत आहे” अशा प्रकारची भाषा योग्य नाही, अशी टीका केली. गुन्हा सिद्ध होण्याआधी कोणी दोषी ठरतो का, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केल्यानंतर, “आम्ही बोलायला लागलो तर अजित पवारांचीच अडचण होईल,” असा इशारा चव्हाण यांनी दिला. “अजितदादा, आपल्या गिरेबानात झाक के देखीए,” असे म्हणत त्यांनी पवारांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकर्ते रोज आपल्याकडे विविध व्यथा मांडतात, त्यामुळे त्यांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.
या प्रकरणावर भाजपचे आणखी एक नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया देत, अजित पवारांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे टाळायला हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.

