अमरावती : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. रवी राणा यांनी तब्बल ३२ जागांवर उमेदवार उभे करत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मैदानात उतरत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे या लढतीत केवळ पक्षीय नव्हे, तर वैयक्तिक राजकीय प्रतिष्ठाही पणाला लागल्याचे चित्र आहे.
दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी या संपूर्ण घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी आपल्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या रवी राणा यांचे उघडपणे कौतुक केले असून, योग्य वेळ आल्यास त्यांचा शाल देऊन सत्कार करण्याचा मानसही व्यक्त केला आहे. “राजकारणात मतभेद असले तरी ताकदीचं कौतुक करायला हवं,” असे म्हणत कडूंनी रवी राणांच्या राजकीय प्रभावाची दखल घेतली.
नवनीत राणांची ठाम भूमिका
भाजपच्या नेत्या असतानाही नवनीत राणा यांनी आपल्या पतीच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्धार दाखवून दिला आहे. पतीविरुद्ध राजकीय लढत उभी राहिल्यास भाजपविरोधातही उभं राहण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. “पतीसाठी लढणं हा माझा धर्म आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपला टोला, नेतृत्वावर सवाल
बच्चू कडू यांनी यावेळी भाजप नेतृत्वावरही टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोवर भाष्य करताना, “तो रोड शो नव्हता, फक्त दिखावा होता,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. भाजपला रवी राणा यांची गरज आहे आणि त्यांच्या शिवाय अमरावतीत भाजपला यश मिळणं कठीण आहे, असा दावाही कडूंनी केला.
यशोमती ठाकूर यांचा अप्रत्यक्ष हल्ला
या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली. “संविधानावर प्रश्न विचारणाऱ्या बाईंनी अजून हनुमान चालीसा म्हणून दाखवलेली नाही,” असा टोला त्यांनी लगावला. नवनीत राणा यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक जिंकली आणि नंतर हिंदुत्वाची भूमिका घेतली, असा आरोपही ठाकूर यांनी केला.
अमरावतीत राजकीय समीकरणे बदलणार?
एकीकडे भाजप आणि राणा दाम्पत्यातील संघर्ष, दुसरीकडे बच्चू कडू यांची अनपेक्षित भूमिका आणि काँग्रेसची टीका — या सगळ्यांमुळे अमरावती महापालिका निवडणूक केवळ स्थानिक लढत न राहता राज्यपातळीवरील राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
आता या साऱ्या घडामोडींचा अंतिम निकाल मतदार कोणत्या बाजूने देतात, याकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

