Explore

Search

February 9, 2026 6:42 am

शिरूर तालुक्यात शेतातील घर पेटवून जाळल्याची धक्कादायक घटना; तरुणावर गंभीर गुन्हा दाखल !

शिरूर | प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील निमोणे गावच्या भोसेवस्ती परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका गंभीर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाढदिवसानिमित्त झालेल्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाने शेतातील राहते घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल ज्ञानदेव काळे (वय 21, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. निमोणे, भोसेवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत असलेल्या शेडमध्ये झोपलेले असताना, त्यांचा मित्र अक्षय संतोष वाळुंज (रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) याने मागील दिवशी वाढदिवसाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ही कृत्य केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपी अक्षय वाळुंज याने शेडसमोरील ऊसाच्या पाचटापासून तयार केलेल्या राहत्या घराला पेट्रोल व आगकाडीच्या सहाय्याने आग लावली. या आगीत फिर्यादीचे राहते घर पूर्णपणे जळून खाक झाले असून, घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खटींग करत असून, शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे निमोणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस पुढील तपासात आरोपीला ताब्यात घेण्याची शक्यता असून, घटनेचा नेमका उद्देश आणि नुकसानाची अचूक माहिती तपासातून स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर