मुंबई : 26 जुलै रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशीष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. मुंबईकर पूरस्थितीत अडकले असताना राज ठाकरेआणि उद्धव ठाकरे नेमके कुठे होते, असा थेट सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
शेलार म्हणाले की, एक भाऊ बंगल्यावर तर दुसरा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असल्याच्या चर्चा असताना सामान्य मुंबईकर मात्र पाण्यात अडकून त्रस्त होता. ठाकरे बंधू ‘अस्तित्वाच्या लढाईत’ असल्याचा दावा करत असले तरी हा फक्त बनावट नरेटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 आणि 2017 च्या निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले होते, असेही शेलार यांनी नमूद केले.
आजही ठाकरे बंधू आणि त्यांचे पक्ष अहंकाराच्या टोकावर उभे असल्याचा आरोप करत, “आम्हीच मराठी, आम्हीच मुंबई” असा दृष्टीकोन मुंबईकर स्वीकारणार नाहीत, असे शेलार म्हणाले. येणारी निवडणूक ही मराठी संस्कृती, महाराष्ट्राचा विकास आणि मुंबईच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांचा पाठिंबा नरेंद्र मोदी , देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा करत शेलार यांनी ठाकरे बंधूंवरची टीका अधिक तीव्र केली.

