पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराने वेग पकडला आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना राज्यातील प्रमुख नेते सभा, बैठका आणि रोड शोच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडे सर्वच पक्षांचे विशेष लक्ष लागले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी रणनिती आखली होती. दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आरपीआय (खरात) गटाशी युती केली होती. मात्र प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच या युतीला मोठा धक्का बसला आहे. आरपीआय (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी अचानक महापालिका निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या रणनीतीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरात गटाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काही जागा देण्यात आल्या होत्या, मात्र त्या जागांबाबत समाधान न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सचिन खरात यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. “मला सन्मानजनक पद्धतीने जागा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेतून मी माघार घेत आहे. कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला माझा पाठिंबा असणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडणुकीचे गणित बदलण्याची शक्यता असून, आता अजित पवार पुढची राजकीय चाल काय खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

