Explore

Search

February 9, 2026 6:42 am

शिरूर तालुक्यात ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

लंघेवाडी : शिरूर तालुक्यातील करडे गावच्या हद्दीतील लंघेवाडी परिसरात निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

मृत व्यक्तीचे नाव कैलास मारुती गायकवाड असून ते करडे गावच्या बाजूकडून निमोणे गावाच्या दिशेने आपल्या दुचाकी क्रमांक एमएच १२ पीवाय ३१५८ वरून प्रवास करत होते. त्याच वेळी लोखंडे फॉर्मकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निळ्या रंगाचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ( एमएच १६ एएम ७८०६) अत्यंत भरधाव वेगाने, बेदरकारपणे व वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून येत होता. सदर ट्रॅक्टर चालकाने नियंत्रण गमावल्याने थेट कैलास गायकवाड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून मांडीपासून नडगीपर्यंत गेल्याने त्यांना अतिशय गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की कैलास गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चालकाने कोणतीही मदत न करता, अपघाताची खबर पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळ काढला. या निष्काळजी व अमानवी कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मृताचे भाऊ विलास मारुती गायकवाड (वय ५४, व्यवसाय शेती, रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार खबाले हे करत असून फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच ट्रॅक्टरच्या मालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण व अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर