महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून राज्यातील 29 महापालिका क्षेत्रांमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज राजकीय वातावरण अधिकच तापलेले पाहायला मिळत आहे.
पुण्यात ज्या ठिकाणी मुख्यमंत्री यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, त्याच परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी मनसे अध्यक्ष Raj Thackeray स्वतः उपस्थित राहिले आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंच्या ताफ्याचा रस्ता पोलिसांकडून अडवण्यात आल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याची सुरुवात गोखलेनगर येथून झाली असून, पुढील कार्यक्रमांसाठी ते मार्गस्थ झाले आहेत.
याचदरम्यान, पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकाच शहरात, जवळपास एकाच वेळी कार्यक्रमांमुळे आमने-सामने येणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, फडणवीस यांनी प्रचारादरम्यान “जनतेने आधीच निर्णय घेतला असून जनतेच्या मनात महायुती आहे. महायुती मोठ्या संख्येने जागा जिंकून निवडून येईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यातील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

