नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, 17 सप्टेंबर रोजी 76 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून देशभरात विविध सेवा, जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा टप्पा लक्षात घेऊन भाजपकडून आजपासून महिनाभर चालणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानातील लक्षवेधी उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘आशीर्वाद का दिया’. या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र किंवा राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या कुटुंबांच्या घरी जाऊन दिवा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे ‘आशीर्वाद का दिया’ उपक्रम?
‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमांतर्गत 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी दिवा लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेषतः केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या कुटुंबांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दिवा लावल्यानंतर त्याचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यासाठी #AshirwadKaDiya हा हॅशटॅग वापरण्यात येणार आहे.
मोदींना समर्पित ‘आशीर्वाद का दिया’ गीत
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर संगीतकार अमन पंत आणि गायिका स्नेहा शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘आशीर्वाद का दिया’ हे गीत प्रदर्शित केले आहे. अमन पंत यांनी या गाण्याला संगीत दिले असून स्नेहा शंकर यांनी ते गायले आहे.
या गीताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला समर्पित संगीतमय अभिवादन म्हणून सादर करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अमन पंत आणि स्नेहा शंकर यांनी म्हटले की, “आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सार्वजनिक जीवन पाहत मोठे झालो आहोत. याच प्रवासातून प्रेरित होऊन आम्ही हे गाणं त्यांना समर्पित करत आहोत.”
17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’
भारतीय जनता पक्षाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अभियानामध्ये सेवा आणि जनजागृतीशी संबंधित विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
मोदींच्या राजकीय आणि सार्वजनिक प्रवासाशी संबंधित फोटो आणि डिजिटल प्रदर्शनं, विकासकामे आणि सरकारी योजनांवर आधारित कार्यक्रम, चर्चासत्रे तसेच युवकांशी संवाद यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे.
मोदींच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण
नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा टप्पा गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमांच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यासोबतच मोदींच्या सार्वजनिक जीवनातील विविध टप्पे आणि सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

