शिरूर : जनावरांची दाटीवाटीने आणि कोणतीही योग्य खाद्य-पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने वाहतूक करणाऱ्या वाहनावर शिरूर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन जर्सी गायींसह महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ६ वाजता मौजे निर्वी, ता. शिरूर येथील पावर वस्ती परिसरात न्हवरा-काष्टी रस्त्यावर शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाला महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच-१२-एमव्ही-३७३५) संशयास्पदरीत्या जनावरांची वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन जर्सी गायी दाटीवाटीने भरलेल्या आढळून आल्या. जनावरांना वाहतूक करताना खाद्य व पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचेही निदर्शनास आली आहे. या प्रकरणी वाहनचालक राहुल बाळू साळवे (वय ३१, रा. साबळेवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर) तसेच सलीम कुरेशी (रा. बेल्हे, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत अंदाजे ६० हजार रुपये किमतीच्या तीन जर्सी गायी आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. प्राण्यांना क्रूरतेने वागविणे अधिनियम, १९६० चे कलम ११(१) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) आणि संबंधित कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले शिरूर पोलीस स्टेशन करीत आहेत.

