शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन विद्युत ट्रान्सफार्मर खाली पाडून त्यातील ऑईल सांडवून नुकसान केले. त्यानंतर दोन्ही ट्रान्सफार्मरमधील तब्बल १४० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारांची अंदाजे किंमत ८४ हजार रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीचे दोन ट्रान्सफार्मर अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून २२ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी ट्रान्सफार्मर खाली पाडून त्यातील अंदाजे ८० किलो तांब्याच्या तारा लंपास केल्या आहेत. तसेच ‘किसन शेलार’ नावाचा असलेल्या ट्रान्सफार्मरमधील सुमारे ६० किलो तांब्याच्या तारा चोरीस गेल्या.या घटनेत तांब्याच्या तारांची अंदाजे ८४ हजार रुपयांची चोरी झाली असून, ट्रान्सफार्मर खाली पाडल्याने तसेच त्यातील ऑईल सांडल्याने महावितरणचे अतिरिक्त नुकसान झाले आहे.
याप्रकरणी फिर्यादी सुरज शंकर लोहारे, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय विद्युत कायदा कलम १३६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे करीत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

