पुणे जिल्ह्यातील शिरूरसह ८ तालुक्यांचा समावेश; पीक नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र निर्णय होणार
पुणे ( प्रतिनिधी ) : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाची तूट व अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळासाठी ‘ट्रिगर-१’ लागू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून संबंधित तालुक्यांमध्ये विविध सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यासह विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता देऊन जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा वापर, जलसंधारणाची कामे सुरू करणे, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करण्याच्या उपाययोजनांचाही शासन निर्णयात समावेश आहे. शेतमजूर व रोजंदारीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठीही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिरूरसह पुणे जिल्ह्यातील ८ तालुके
शासनाच्या परिशिष्टात पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातही दुष्काळासाठी ‘ट्रिगर-१’ अंतर्गत शासनाच्या सवलती व उपाययोजना लागू होणार आहेत.
दरम्यान, दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबतची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पीक नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लातूरसह मराठवाड्यातील अनेक तालुक्यांचा समावेश
या यादीमध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट या दहा तालुक्यांचाही समावेश आहे.
एकूण ३४ जिल्ह्यांतील २६५ तालुके दुष्काळासाठी ‘ट्रिगर-१’ अंतर्गत आले असून, या तालुक्यांमध्ये शासनाच्या विविध सवलती व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

