Explore

Search

October 17, 2026 6:07 am

‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे अस्तित्वच संपले असते’; चंद्रकांत रघुवंशींच्या वक्तव्याने खळबळ !

नंदुरबार : महायुती सरकारमधील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या सत्तेतील पुनरागमनाचे श्रेय थेट एकनाथ शिंदे यांच्या उठावाला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना रघुवंशी यांनी म्हटले की, महाविकास आघाडीच्या काळात भाजप सत्तेत नव्हता. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतरच राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजपचे अस्तित्वच राहिले नसते, असा दावा त्यांनी केला.

“भारतीय जनता पक्षाला जिवंत एकनाथ शिंदेंनी करून दिले. महाविकास आघाडीच्या काळात भाजप कुठे सत्तेत होता? एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतरच भाजप सत्तेत आला,” अशा आशयाचे वक्तव्य रघुवंशी यांनी केले.याचवेळी रघुवंशी यांनी भाजप नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावरही निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर गावित यांना मंत्रिपद मिळाले आणि त्यांची ‘लॉटरी लागली’, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. गावित अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री राहिल्याचाही उल्लेख रघुवंशी यांनी केला.

रघुवंशी यांच्या या वक्तव्यामुळे विशेषतः नंदुरबारमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संबंधांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महायुतीतील दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी असताना मित्रपक्षाच्या आमदाराकडून भाजपच्या सत्तेतील भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केल्याने या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आता रघुवंशी यांच्या वक्तव्यावर भाजपकडून तसेच डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर