शिरूर : कारेगाव येथील साईनगर परिसरात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख (वय ३९) यांची अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.हामजा शेख हे विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करीत होते. मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर पावणेसातच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांच्या पत्नीला फोन करून हामजा हे प्लॅन्टमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम असून, गोळी आरपार गेल्याचे आढळून आले. पुढील शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पाण्याच्या प्लॅन्टमध्ये गोळीची रिकामी पुंगळी आढळून आली. घटनेच्या काही वेळापूर्वी परिसरात फटाका फुटल्यासारखा मोठा आवाज ऐकू आल्याची माहिती एका महिलेने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे गोळीबार नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हामजा शेख यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांनी केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे तपास करीत आहेत.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.

