इचलकरंजी : गरीब व असहाय महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा गैरफायदा घेत अनैतिक व्यवसाय चालविल्याच्या आरोपावरून शाहापूर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पूजा अभिजीत पाटील (रा. शिवाजीनगर, कोरोची, ता. हातकणंगले) हिला अटक करण्यात आली असून, तिच्याकडून रोख रक्कम व मोबाईल हँडसेटसह एकूण २८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शाहापूर पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक फौजदार सुवर्णा सागर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गरीब व असहाय महिलांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनैतिक व्यापार करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तसेच ग्राहकांकडून प्रत्येक कामासाठी सुमारे २ हजार रुपये घेत व्यवसाय चालविला जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान २,००० रुपये रोख, विविध किंमतीच्या चलनी नोटा, Nirrodh कंपनीचे पाकिटे तसेच Redmi Note 14 Pro 5G, Vivo Y100 आणि Poco C71 असे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण २८,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.३३ वाजता करण्यात आली. आरोपी महिलेला अटक करून ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५, ६ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास शाहापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

