कोकण ( प्रतिनिधी ) : साईकृपा सदगुरू फाउंडेशन (एनजीओ) भारतचा चौथा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी साईनाथ नगर, मरोळ पाइपलाइन येथे उत्साहात पार पडला. संस्थेच्या वतीने यानिमित्त सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत गुणाजी गावणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करण्यासोबतच अन्यायाविरुद्ध आवाज उठवून प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला उन्नतीची दिशा देण्याचे काम संस्था करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त संस्थेसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ‘समाजसेवा गौरव पुरस्कार’, तर संस्थेबाहेर राहूनही सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व संस्थेला सातत्याने सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या दिपाली यशवंत सिनारे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सहचिटणीस माधव कांबळे, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस सचिन रामाणे, मनसे वाहतूक विभागाचे अध्यक्ष अनुप गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वाशिम हाशमी, तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी अनिकेत धुर्यो, आस्था माईल आणि सुशांत वडके यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांना समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर माधव कांबळे, सचिन रामाणे, अनुप गुप्ता आणि वाशिम हाशमी यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थेच्या उपाध्यक्ष श्वेता सूर्यकांत गावणकर, सचिव विकास रामाणे, उपसचिव संजय बेंनबन्सी, खजिनदार गंगाधर कुंभारे, सल्लागार प्रशांत वाजे यांच्यासह मुंबई जिल्हा व विविध तालुका आणि विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी संस्थेचे सचिव विकास रामाणे यांनी साईकृपा सदगुरू फाउंडेशनच्या चार वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

