Explore

Search

October 17, 2026 6:29 am

कोणाचे भाग्य उजळणार, कोणाचे समीकरण बिघडणार? ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण सुटणार!

रिसोड (तालुका प्रतिनिधी ) : रिसोड तालुक्यातील आगामी २०२५-२०३० या कार्यकाळासाठी स्थापन होणाऱ्या ८० ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांच्या सुधारित आरक्षणाची सोडत शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता तहसिल कार्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे. या आरक्षण प्रक्रियेमुळे संपूर्ण रिसोद तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावपुढाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

उपविभागीय अधिकारी तथा नियंत्रक अधिकारी वैशाली देवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, नायब तहसीलदार रावसाहेब देशपांडे, गजानन जावादे व टी. डी. कुलमेथे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आरक्षणाची प्रभागनिहाय आकडेवारी:

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकूण ८० ग्रामपंचायतींपैकी विविध प्रवर्गांसाठी खालीलप्रमाणे पदे निश्चित केली जाणार आहेत:

नागरिकांचा मागासवर्ग (OBC): ८ पदे

नागरिकांचा मागासवर्ग (महिला): ९ पदे

सर्वसाधारण (General): २० पदे

सर्वसाधारण (महिला): २० पदे

इतर राखीव प्रवर्ग (SC/ST व इतर): २३ पदे

एकूण सरपंच पदे: ८०

गावागावांतील राजकीय समीकरणे बदलणार

नवीन आरक्षण प्रणालीमुळे अनेक प्रस्थापित आणि इच्छुक उमेदवारांच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये महिला किंवा इतर राखीव प्रवर्गासाठी आरक्षण पडेल, तिथे नवीन चेहऱ्यांना आणि महिलांना नेतृत्वाची संधी उपलब्ध होईल.

“आमच्या गावातील सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी सुटणार?” या एकाच प्रश्नाने रिसोद तालुक्यातील प्रत्येक गल्लीबोळात आणि चावडीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ९ ऑक्टोबरच्या सोडतीनंतरच कोणत्या गावाचा कारभार कोणाच्या हाती जाणार याचे स्पष्ट चित्र समोर येणार असल्याने, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर