अहेरी, जि. गडचिरोली : नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या बिलाच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून अहेरी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक अमोल विलासराव गुडेलीवार (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी अहेरी येथे करण्यात आली. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे इलेक्ट्रिकल ठेकेदार असून त्यांचे अहेरी येथे इलेक्ट्रिकल दुकान आहे. त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना २०२५-२६ अंतर्गत अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याचे काम मिळाले होते.प्रभाग क्रमांक १ ते १० मधील कामासाठी ९ लाख ९३ हजार ९०९ रुपये, तर प्रभाग क्रमांक ११ ते १७ मधील कामासाठी ९ लाख ९३ हजार ८५६ रुपये अशी एकूण १९ लाख ८७ हजार ७६५ रुपयांची निविदा मंजूर झाली होती. यापैकी प्रभाग क्रमांक ११ ते १७ मधील काम तक्रारदार यांनी करारनामा करून पूर्ण केले होते. तसेच, त्यांच्या मित्राकडून प्रभाग क्रमांक १ ते १० मधील कामावरही ते देखरेख ठेवत होते.दोन्ही कामे निर्धारित १८० दिवसांच्या मुदतीत पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कामांची संपूर्ण बिलेही अदा झाली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेलीवार हे तक्रारदार यांच्या दुकानात येऊन नगरोत्थान योजनेतील कामे आपण जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली येथून मंजूर करून आणल्याचे सांगत होते. या कामांच्या मोबदल्यात मंजूर बिलांच्या एकूण रकमेच्या १५ टक्क्यांप्रमाणे तीन लाख रुपये देण्याची मागणी ते वारंवार करत असल्याचा आरोप आहे.तक्रारदार यांनी नाइलाजास्तव ५ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला ३० हजार रुपये रोख दिले होते. मात्र, त्यानंतरही उर्वरित दोन लाख ७० हजार रुपयांची मागणी सुरूच असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया यांच्याकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांच्या उपस्थितीत आणि व्हॉइस रेकॉर्डरच्या साहाय्याने लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपीने तक्रारदार यांच्याकडे उर्वरित दोन लाख ७० हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे विभागाच्या अहवालात नमूद आहे.तक्रारदार यांनी सध्या एक लाख २० हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने ती रक्कम आपल्या हार्डवेअरच्या दुकानात आणून देण्यास सांगितल्याचा आरोप आहे.त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख २० हजार रुपये स्वीकारताना आरोपी अमोल गुडेलीवार यांना पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी अहेरी पोलीस ठाणे, जिल्हा गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथील पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक अरविंद राऊत आणि त्यांच्या पथकाने केली. पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, हेड कॉन्स्टेबल संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर तसेच पोलीस कर्मचारी संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे आणि दीपक बाटबर्वे यांचा समावेश होता.

